Tuesday 21 February 2017

दोन कविता...

१.
माझ्या कवितांमध्ये
अजुनही
तिची
सावली पडते
काय हवं असतं
अजून कविला...

२.
तिने
न वाचलेल्या
कविता तशाच आहेत
अजूनही पानावरची शाई
ओली आहे...

© दिपक रा पाटील

Friday 17 February 2017

ओलावा...

ओठांनी
शिवलेल्या
वहीच्या
पानावरची
'कविता'
कोरडी
कशी
होऊ
शकते.

© दिपक रा पाटील

Monday 13 February 2017

प्रेमरंग...!!!

असा हा प्रेमरंग येई संग संग
मन दंग होई त्यात 
लागे वेड हे असे घेऊनी तरंग
अवघ्या सोळा आयुत,

तुझ्या-माझ्या सारखी निळ्याभोर नभी
पाखरे विरहती संघ
तु नसता जवळ सखे मन होई पोरके
आयुष्य वाटे मज बेरंग,

सांज सरता सरता रवी घरी परतता
आसमंत होई तिरंग
रात अशी यावी चौघडा वाजावा गावी
सुरू व्हावा मग प्रेम अभंग.

© दिपक रा पाटील.

Wednesday 8 February 2017

पुस्तकं असती पुस्तकं...

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं घडवी मस्तकं
पुस्तकांतून वाहे ज्ञानझरा
पुस्तकांत सापडे उद्देश खरा

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकांत जिंकण्याची ओढं
पुस्तके उलगडती कोडं
पुस्तके जिंकवीती गडं

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकांत अवघे जग
पुस्तकं शिकवीती जगणे
जरा उघडून तर बघ

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तक कुणाचे जगणे
पुस्तक हाती पडता
सुधारले कुणाचे वागणे

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तक म्हणजे रहस्य
विनोदी,दुःखी लेखकाचं
अलगद रडवणारं हास्य

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं शब्दांची भाषा
तलवारांपेक्षा धारधार
वचनांची त्यात नशा

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं सारा आसमंत
न संपणारा हा सागर
अनुभूती देई अनंत

© दिपक रा पाटील

एक असतं हॉस्पीटल...

एक असतं हॉस्पीटल तिथं जन्म-मृत्यू अटल
जगला तर पेढे नाहीतर त्याच्याच भोवती वेढे

एक असतं हॉस्पीटल तिथं जगवण्याची धावपळ
जगला तर आनंद नाहीतर जवळच्या हृदयांना कळ

एक असतं हॉस्पीटल तिथं असतात श्वासांचे खेळ
जन्ममृत्युच्या अंतरातला एक जगण्याचा मेळ

एक असतं हॉस्पीटल तिथं न कुणी लहान मोठा
तिथं असतो जगवण्यासाठी औषध,इच्छाशक्तीचा वाटा

एक असतं हॉस्पीटल तिथं असते रूग्नांची सेवा
ना कुठल्या जाती-धर्माचा भेदभाव येथे सार्यांचाच येवा

© दिपक रा पाटील