Monday 15 May 2017

गुदमरलेलं शहर अन् पाऊस...

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला मोठा
माणूस झाला खोटा

ये गं ये गं सरी
माझे मडके भरी
पैसा आला धावून
माणूसकी गेली वाहून

ये रे ये रे ढगा
मऊ तुझा फुगा
शहरात तर नाहीच नाही
तुझा गावाकडे पण दगा

ये रे ये रे थेंबा
कसा पिकेल आंबा
शहरातल्या धुराड्यानं
तुलाही केलाय लंबा

या गं या गं धारा
फुलवा मोर पिसारा
गोठ्यातल्या गुराढोरांना
कुठून मिळेल मग चारा

ये रे ये रे घना
नको देऊ यातना
बसलाय राजा पेरणी करून
आख्या शिवारात दाणा

ये गं ये गं लहर
तुझ्याशिवाय नाही बहर
असं हे धुराटलेलं
गुदमरलेलं शहर

© दिपक रा पाटील.

Sunday 14 May 2017

श्रावणसरी...

ग्रीष्म लोपला
मेघ दाटले
बरसल्या श्रावणसरी,

चांदणं निजले
तिमीर अवतरले
भरली गोदावरी,

टिपूर टपटप
येई सपासप
अंगणी घरोघरी,

अवखळ वारा
खळखळ झरा
फुटती बांध तिरी,

अवती भवती
मेघ स्पर्शती
दिसे पर्वत शिरी,

सप्त रंग
निळाई संग
शोभती अंबरी.

© दिपक रा पाटील.

आरक्षण...

एकदा पावसाकडे नद्या,नाले,तलाव,विहिर,डबके,धरण आणि समुद्राने
आपल्या आकाराप्रमाणे आरक्षण मागितले...काही वेळानंतर माझा गरीब शेतकरी म्हणाला,"काही यांच्यामधून थोडं उरलं असल तर माझ्या शेतातही पड थोडावेळ"

©  दिपक रा. पाटील.