Tuesday 17 January 2017

तू असतांना, तू नसतांना

तू असतांना आभाळ भरगच्च भरतं
तू नसतांना तेच मग डोळ्यांतून वाहतं

तू असतांना सागरी उसळत्या लाटा 
तू नसतांना सारीकडेच मोकळ्या वाटा

तू असतांना चाफा चहूबाजूंनी फुललेला
तू नसतांना तोही फुलण्यास घाबरलेला

तू असतांना ऊन वारा पाऊस सारखाच
तू नसतांना दिवस रात्रींचा खेळही परकाच

तू असतांना असते दररोज दिवाळी
तू नसतांना नसते दिवाळीतही दिवाळी

तू असतांना प्रत्येक विषयात स्कोरींग
तू नसतांना प्रत्येक लेक्चर बोरींग

तू असतांना मी गातो सुरात गाणे
तू नसतांना त्याच सुरांचे बेसूर होणे

तू असतांना ग्रंथालय संपूर्ण भरलेलं
तू नसतांना पुस्तकाचं पानही न पलटलेलं

तू असतांना वाटते सायकल पण कार
तू नसतांना वाटते मर्सडीज पण बेकार

तू असतांना सगळं जग भारी भारी
तू नसतांना टपरीवर सारखी उधारी

तू असतांना मन कसं शांत शांत 
तू  नसतांना मग कवितेचा प्रांत

तू असतांना तूच माझं जग
तू नसतांना सारखी तगमग

तू असतांना वाटतं तुझ्याकडेच बघावं
तू नसतांना मग कुणासाठी जगावं

तू असतांना सुचत नाही काही
तू नसतांना सुचणं थांबत नाही

तू असतांना मी संपूर्ण तुझ्यात
तू नसतांना मी न उरतो माझ्यात

तू असतांना हृदयाची सारखी धडधड
तू नसतांना हृदय चालतय हेच मात्र भाग्य

© दिपक रा पाटील.

No comments: